spot_img
spot_img
spot_img

एआयच्या जमान्यातील ‘सुपर टॅलेंटेड किड’ अविन्या ; इंटरनॅशनल व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीचा विश्वविक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एआय, तंत्रज्ञान आणि वेगवान बदलांच्या या जमान्यात नैसर्गिक बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती आणि भाषिक कौशल्यांचे आश्चर्यकारक दर्शन घडवणारी एक चिमुकली सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे (महाराष्ट्र) येथील अवघ्या एक वर्ष सहा महिन्यांची अविन्या अंकुश जगताप हिने आपल्या असामान्य क्षमतेच्या जोरावर International Book of Records तसेच India Book of Records मध्ये नोंद मिळवत ‘Super Talented Kid’ हा मान पटकावला आहे. तिला ‘One in a Million’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

११ ऑक्टोबर २०२५ रोजी हा सन्मान अविन्याला प्रदान करण्यात आला. एवढ्याशा वयात इंग्रजी वर्णमाला, आठवड्याचे दिवस, वर्षातील महिने, इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील कविता, विविध गाणी अचूकपणे सादर करत तिने परीक्षकांनाही थक्क केले. तिच्या या विलक्षण कौशल्यांची दखल घेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर तिच्या नावाची विक्रमी नोंद करण्यात आली.

अविन्या… म्हणजे इनोव्हेशन

अविन्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. जन्माला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने कुशीवर वळून पाळण्याचा कठडा धरल्याची आठवण कुटुंबीय आजही सांगतात. वयाच्या अवघ्या चौथ्या महिन्यातच तिने पहिल्यांदा ‘बाबा’ असा शब्द उच्चारला. अगदी बाळ असल्यापासूनच गाणी, सूर, आवाज याकडे ती विशेष लक्ष देत होती. गाणे ऐकले की शब्द पकडण्याचा, त्याची नक्कल करण्याचा तिचा प्रयत्न सातत्याने दिसायचा.

वडील अंकुश जगताप, आई श्वेता जगताप, आजी कोंडाबाई आणि मोठा भाऊ शर्विल यांच्या सहवासात अविन्या रोज नवनवीन गोष्टी शिकत गेली. बडबड गीते, बालगीते, श्रावणातील फेराची गाणी, महिलांच्या खेळांची गाणी, भोंडल्याची गाणी – एकदा ऐकली की ती थेट तिच्या तोंडात बसत. एक ते दहा आकडे, एबीसीडी अगदी झेडपर्यंत क्रम न चुकवता, वारांची नावे, महिन्यांची नावे ती सहज म्हणते. इतकेच नव्हे तर गणपतीची आरती आणि संपूर्ण ‘जन गण मन’ राष्ट्रगीतही ती कुठेही न अडखळता सादर करते. एवढ्याशा वयात इतकी स्पष्टता आणि अचूकता पाहून अनेकांचा विश्वासच बसत नाही.

शाळेत ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

मारुंजी येथील जिल्हा परिषद शाळेत अविन्याचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी तिने सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर थक्क झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांपेक्षा अविन्याच सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

निसर्गसंपन्न वातावरणाचा सकारात्मक प्रभाव

मारुंजीसारख्या निसर्गसंपन्न परिसरात घर, परसबाग आणि शेती यामध्ये वाढ झाल्यामुळेच तिच्या क्षमतांचा विशेष विकास झाला असावा, असे तिचे पालक सांगतात. मुक्त वातावरण, सतत संवाद, गाणी आणि कुटुंबीयांचा वेळ यामुळे तिची स्मरणशक्ती आणि बोलण्याची क्षमता अधिकच बहरली. अनेकांच्या मते ही एक दैवी देणगीच आहे.

बालविकासाच्या तुलनेत अविन्याची झेप

बालविकास तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारणपणे मुलं ९ ते १२ महिन्यांदरम्यान एक-एक शब्द बोलू लागतात. एक ते दीड वर्षांच्या वयात ‘आई’, ‘बाबा’सारखे दोन-तीन शब्द, तर २ वर्षांपर्यंत दोन शब्दांची वाक्यरचना सुरू होते. आठवड्याचे दिवस, महिने, वर्णमाला किंवा संपूर्ण गाणी लक्षात ठेवणे हे बहुतेक मुलांमध्ये ३ ते ४ वर्षांनंतर दिसून येते.

या तुलनेत अविन्याने अवघ्या दीड वर्षांच्या आत जे काही साध्य केले आहे, ते निश्चितच अपवादात्मक म्हणावे लागेल. मात्र तिचे पालक याकडे स्पर्धा किंवा दबाव म्हणून न पाहता, तिच्या नैसर्गिक क्षमतेला योग्य वातावरण देण्यावर भर देतात.

शाळेबाबत पालकांची ठाम व स्पष्ट भूमिका

अविन्याच्या शिक्षणाबाबत बोलताना वडील अंकुश जगताप सांगतात, “मुलांना खेळण्याबागडण्याच्या वयात शाळेत पाठवू नये. बालपण हे मुक्त, नैसर्गिक आणि आनंदी असावे. त्यामुळे अविन्याला शाळेत घालण्याची कोणतीही घाई आम्ही करणार नाही.”

आई आणि आजी गृहिणी असल्याने अविन्याला घरात भरपूर वेळ, लक्ष आणि प्रेम मिळते. खेळायला, खोड्या काढायला, भांडायला आणि काळजी घ्यायला मोठा भाऊ शर्विल कायम तिच्या सोबत असतो.

‘दहा लाख मुलांत एक’

अविन्या मोठी होऊन काहीतरी अद्वितीय करेल आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा ठाम विश्वास तिच्या पालकांना आहे. ‘दहा लाख मुलांत एक’ असा सन्मान मिळालेली ही चिमुकली आज केवळ इंटरनॅशनल व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधील नोंद नाही, तर समजूतदार पालकत्व, नैसर्गिक बालविकास आणि मातृभाषेच्या महत्त्वाचा जिवंत संदेश देणारी प्रेरणादायी कथा ठरत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!