spot_img
spot_img
spot_img

महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास, नागरी प्राधान्य आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशात आदर्श ठरले आहे. या यशामागे महापौरांनी सभागृहातून घेतलेले निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्वता आणि शहराच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य कारणीभूत आहे. सभागृहाची हीच गरिमा महापौर व उपमहापौर जपतील आणि शहर विकासाला प्राधान्य देतील असे निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची निवड झाली. महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार त्यांना माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. विहित मुदतीमध्ये रवी लांडगे यांनी माघार घेतली नाही. त्यानंतर निवडणूक अधिकारी सभेचे अध्यक्ष सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ११ वाजून २० मिनिटांनी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी माघार घेतली. यामुळे शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी महापौर आणि उपमहापौर यांना निवडीनंतर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले शहराच्या विकासात सभागृहाच्या भूमिकेचे महत्त्व मोठे आहे. पिंपरी चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशात आदर्श ठरले. या यशामागे या सभागृहातून घेतले गेलेले निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्वता आणि शहराच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडने काळानुसार स्वतःत बदल घडवत उद्योग, आयटी, शिक्षण, मेट्रो आणि पायाभूत सुविधांचा समतोल साधणारे आधुनिक महानगर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हा विकास कोणत्याही एका व्यक्तीमुळे नव्हे, तर सभागृहातील सामूहिक निर्णय प्रक्रियेचा परिणाम आहे. या सभागृहात मतभेद असले तरी मनभेद कधीच नसतात. विरोध असतो मात्र विकासाला अडथळा नसतो, हीच सभागृहाची खरी गरिमा महापौरांनी जपावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड पालिकेची ३ वर्ष १० महिने २४ दिवसांची प्रशासकीय राजवट आज महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या निवडीनंतर संपुष्टात आली आहे. यापुढील काळात नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख राहील, प्रत्येक सदस्याला समान संधी मिळेल आणि शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढेल असे काम करतील. भाजपाला नागरिकांच्या पाठिंब्याने मोठे यश मिळाले आहे. नागरिकांनी दिलेला हा विश्वास हे सभागृह सार्थ ठरवेल असा विश्वास आहे.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!