spot_img
spot_img
spot_img

निगडी–दापोडी रस्त्यावर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्गाला मिळणार गती ; संदीप वाघेरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड शहरातील वाहतूक सुलभतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या निगडी–दापोडी रस्त्यावरील पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूलासमोर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग (Light Vehicular Underpass) उभारणीच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. या संदर्भात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे.

पिंपरी LC गेट क्र. ६० येथे उभारण्यात येत असलेला चार पदरी रेल्वे उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. हा उड्डाणपूल पिंपरी गाव, रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र उड्डाणपूलावरून येणाऱ्या वाहनांना पुणे–मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत वळसा घ्यावा लागतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

ही अडचण लक्षात घेऊन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून अंदाजपत्रकीय समितीकडून तत्वतः मान्यताही मिळाली आहे.

सदर प्रकल्पाचा समावेश सन २०२५–२६ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला असून महापालिका सभेने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या भुयारी मार्गासाठी एकूण रु. ४० कोटींची प्रशासकीय मान्यता असून चालू आर्थिक वर्षासाठी रु. १० लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्तांकडे निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाचे आदेश त्वरीत देण्याची जोरदार मागणी केली आहे. हा भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू झाल्यास हलक्या वाहनांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतिश गावडे, राकेश मोरे, सतीश लांडगे उपस्थित होते

शहराच्या वाहतूक नियोजनात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे निगडी–पिंपरी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!