शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या चैन स्नॅचिंगच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट–१ ने धडाकेबाज कारवाई करत बाहेरच्या जिल्ह्यातून मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
आरोपींकडून चोरी केलेले १०० टक्के सोन्याचे दागिने हस्तगत करत दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–१ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने तब्बल ९५ ते १०० तासांचे व ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी मुख्य रस्ते टाळून वारंवार मार्ग बदलत असल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी अक्षय सुनिल बोरकर (वय २१, रा. श्रमिक नगर, सातपूर, नाशिक) व प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. शिवाजीनगर, गंगापूर, नाशिक) यांना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील संत तुकारामनगर व चिखली पोलीस स्टेशन परिसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून संत तुकारामनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. १६/२०२५ व चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. १९/२०२५ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून नाशिक ग्रामीण हद्दीत त्यांच्यावर २५ हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–१ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.


