राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका आयुक्तांकडे औपचारिक निवेदन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी येथील नवीन डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्र. २१ चे सर्व नगरसदस्य यांच्या वतीने डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार असलेल्या मा. अजितदादा पवार साहेबांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण आणि ऐतिहासिक योगदान दिले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आज सक्षम, आर्थिकदृष्ट्या सबळ आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत महानगरपालिका म्हणून उभी आहे, यामागे अजितदादा पवार साहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त व बळकटीकरण या सर्व क्षेत्रांत त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय शहराच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र, सक्षम आणि सशक्त औद्योगिक व नागरी ओळख प्राप्त झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन डेअरी फार्म उड्डाणपुलाला दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांचे नाव देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण कायमस्वरूपी जपली जाईल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन प्रस्ताव मंजूर करावा व संबंधित विभागास त्वरित कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी डब्बू आसवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्र. २१ चे सर्व नगरसदस्य यांच्या वतीने केली आहे.


