शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी (ता. ३०) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या असता, ते जणू पुन्हा एकदा उपस्थित असल्याचा भास निर्माण झाला. भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांच्या भावनिक मनोगताने सभागृह हेलावून गेले.
“अजित पवार म्हणजे विकासाचे चालते-बोलते विद्यापीठ होते,” असे नमूद करत आमदार गोरखे म्हणाले की, “विमान अपघातात निधन होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी मंत्रालयात मुंबई येथे त्यांची माझी भेट झाली होती. मला आवर्जून आवाज देत ‘तब्येत सांभाळ, घराकडे लक्ष दे,’ असे आपुलकीने सांगणारे अजितदादा दुसऱ्याच दिवशी आपल्यातून निघून जातील, याची कल्पनाही नव्हती.”
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत बोलताना अजितदादांनी, ‘जर दोन महिने आधीच मैदानात उतरलो असतो, तर चित्र वेगळं असतं,’ असे स्पष्ट मत व्यक्त केल्याचा उल्लेखही आमदार गोरखेंनी केला.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी स्वतः भेटीस बोलावून महामंडळातील सुमारे ६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत सूचना देत काम प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला दिला, सही करताना अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा चर्चा कर आणि मग सही कर असा अनुभवही त्यांनी सांगितला.
विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अजित दादा मला ‘आमदारसाहेब’ म्हणायचे. ‘साहेब म्हणू नका,’ असे मी सांगितल्यावर ‘पदाला महत्त्व असतं,’ असे उत्तर देत त्यांनी पदाचा सन्मान जपण्याची शिकवण दिली, असा दिलदार स्वभावाचा प्रसंगही यावेळी उलगडण्यात आला.
या शोकसभेला शहरातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नवचर्चित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


