spot_img
spot_img
spot_img

सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोण नेतृत्व करणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी सुरू होत्या. पक्षातील नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे.

शपथविधीपूर्वी आज दुपारी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. नियोजित वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

या नेता निवडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री तसेच विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार उपस्थित होते. सर्वांनी एकसुरात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, सायंकाळी होणाऱ्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. या ऐतिहासिक घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!