शबनम न्यूज | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती परिसरात झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. याच दिवशी बारामती परिसरात त्यांच्या चार प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
सकाळी सुमारे आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर उतरण्याची तयारी सुरू असतानाच विमानाचा अपघात झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, विमान परिचारिका पिंकी माळी तसेच पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाला.
अपघाताची तीव्रता लक्षात घेता प्रारंभी प्राथमिक चौकशी करण्यात आली असून आता या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे. अपघातामागील नेमकी कारणे, तांत्रिक बिघाड की अन्य कोणती बाब, याचा तपास सीआयडीकडून केला जाणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


