शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस देण्यात यावे, तसेच त्या इमारतीच्या प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे.
योगेश बहल यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सन १९९२ ते २०१७ या २५ वर्षांच्या कालावधीत स्व. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीला सर्व सुख-सुविधांनी युक्त, स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की घरे, मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, प्रेक्षागृहे, उद्याने, व्यायामशाळा, रुग्णालये तसेच मुलींसाठी आयटीआय अशा अनेक विकासकामांमुळे शहराच्या वैभवात भर पडली.
या भरीव कामगिरीची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहराला ‘बेस्ट सिटी अवॉर्ड’ प्राप्त झाला, याची आठवणही बहल यांनी करून दिली.
शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता विद्यमान महानगरपालिका इमारत अपुरी पडत असल्याने मध्यवर्ती ठिकाणी नवीन अत्याधुनिक व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारण्याच्या संकल्पनेत स्व. अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. या इमारतीचे डिझाईन आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यामध्ये दादांची दूरदृष्टी निर्णायक ठरली; मात्र या स्वप्नाची पूर्तता होण्याआधीच त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने आदरांजली म्हणून नवीन प्रशासकीय इमारतीस “स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका” असे नामकरण करण्यात यावे आणि तेथील प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, ही शहरातील नागरिकांची भावना असल्याचे योगेश बहल यांनी स्पष्ट केले.


