शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणणे हे स्वर्गीय अजितदादांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, १२ डिसेंबर रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनच सामोऱ्या गेल्या होत्या. ही केवळ निवडणुकीपुरती युती नव्हती, तर भविष्यातील राजकीय एकत्रीकरणाचा तो स्पष्ट संकेत होता.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, “अजितदादा आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटवून राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकत्र आणण्याची त्यांची ठाम इच्छा होती. दुर्दैवाने त्यांच्या अकाली जाण्याने ही प्रक्रिया थांबली असल्यासारखी वाटत असली, तरी ती थांबणार नाही. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांची इच्छा पूर्ण केली जाईल.”
दरम्यान, आज अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर सुनैत्रा वहिनी पवार यांना संधी देण्याचा प्रस्ताव मांडल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद नव्याने उभी राहील, यात शंका नाही. मात्र, अजित पवार यांची उणीव ही राष्ट्रवादीसह संपूर्ण राज्याला कायम जाणवत राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.


