spot_img
spot_img
spot_img

दापोली तालुक्यात ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त; एकाला अटक

रत्नागिरीत बेकायदेशीर स्फोटकांविरोधात मोठी कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून दापोली तालुक्यात तब्बल ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, रत्नागिरी पोलीस दलाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला बेकायदेशीर स्फोटक पदार्थांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. २८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करत होते.

यावेळी खेड–मंडणगड मार्गावरील मुगीज परिसरात सायंकाळी सुमारे ५.३० वाजता संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थासदृश ७० जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आहे. त्याच्याकडून स्फोटकांसह एक चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे स्फोटक कोणत्या उद्देशाने व कुठून आणले होते, याचा सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!