तीन जण अटकेत
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : अमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचवड परिसरात मोठी कारवाई करत १५ लाख १२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २७ जानेवारी) रात्री बिजलीनगर चौक परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशना सैतानराम देवासी (२५, रा. बिजलीनगर), मेकाराम ऊर्फ शाम नारायणराम देवासी (२६, रा. बिजलीनगर) आणि पुरण चौथाराम देवासी (२४, रा. कात्रज, पुणे) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर नजर ठेवली. संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, १४२ ग्रॅम २३० मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रोन आढळून आले.
अधिक चौकशीदरम्यान, हा अमली पदार्थ कात्रज येथील पुरण देवासी याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांची साखळी, पुरवठा करणारे इतर आरोपी आणि नेटवर्कचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


