spot_img
spot_img
spot_img

अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवारी पुण्यातील सर्व दुकाने बंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक असल्याची भावना व्यक्त करत, गुरुवार, दिनांक 29 जानेवारी रोजी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुण्यातील व्यापारी बांधव या बंदला स्वयंस्फूर्त प्रतिसाद देणार असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले आहे.

या दुःखद प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने पवार कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि असंख्य समर्थकांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या कठीण काळात कुटुंबीयांना व अनुयायांना दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना महेंद्र पितळीया यांनी केली.

जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला असून ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे, असे मत अध्यक्ष फतेचंद रांका यांनी व्यक्त केले.

“अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच उद्योग, व्यवसाय व व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते सदैव स्मरणात राहील,” असेही रांका यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, पुणे शहरातील व्यापारी वर्गाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची पोच अधोरेखित करणारा असल्याचे बोलले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!