spot_img
spot_img
spot_img

अजित दादा म्हणजे पिंपरी-चिंचवडचा अतूट विश्वास; त्यांच्या जाण्याने शहर पोरकं झालं – डब्बू आसवानी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि पिंपरी-चिंचवड शहर हे केवळ नावाचं नातं नव्हतं, तर ते अतूट विश्वासाचं नातं होतं, अशी भावना नगरसेवक हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांनी या शहराचं केवळ पालकत्व स्वीकारलं नाही, तर एका शिल्पकाराप्रमाणे शहराच्या प्रगतीचा प्रत्येक दगड स्वतःच्या हाताने रचला, असे ते म्हणाले.

अजित दादांच्या निधनाने मन सुन्न झाल्याचं सांगत आसवानी यांनी २००७ सालच्या आठवणींना उजाळा दिला. “दादांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली. त्या दिवसापासून सुरू झालेला प्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर तो एक आपुलकीचा, कौटुंबिक नात्यात रूपांतरित झाला,” असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण भारतात कामासाठी स्वतःला झोकून देणारा आणि आपल्या कार्यकर्त्यांवर पोटच्या मुलासारखं प्रेम करणारा नेता दुर्मिळ आहे, असे नमूद करत आसवानी म्हणाले की, अजित दादा म्हणजे शब्दाचा पक्का माणूस होते. दिलेला शब्द पाळणारे आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणारे ते खरे आधारवड होते.

आज मात्र आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितले की, अजित दादांनी कधीही जातीपातीचा भेदभाव न करता कामाच्या बळावर संधी दिली. “माझ्यासारख्या सिंधी समाजातील व्यक्तीला स्थायी समिती सभापती आणि उपमहापौरपदाची संधी देताना त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही. नेतृत्वाची आणि काम करण्याची संधी दिली, ही गोष्ट कायम लक्षात राहील,” असे आसवानी म्हणाले.

आम्हाला कामाची प्रेरणा देणारा, संकटात हात देणारा आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणारा हा ‘किमयागार’ आज आपल्यातून गेला आहे, असे सांगत त्यांनी दादांच्या निधनाला पिंपरी-चिंचवडचं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान असल्याचं स्पष्ट केलं.

“ज्या शहराला दादांनी आपल्या रक्ताचं पाणी करून सजवलं, तेच शहर आज आपल्या पालकाविना पोरकं झालं आहे. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आज अनाथ झाले आहेत. शिस्त, कर्तव्य आणि प्रेम यांचा हा महामेरू आता फक्त स्मृतींत उरला आहे,” अशा शब्दांत आसवानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अखेर, “आदरणीय दादा, तुमच्या आठवणी आणि तुमचं कार्य या शहराच्या कणाकणात कायम जिवंत राहील,” असे सांगत नगरसेवक हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांनी अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!