शबनम न्यूज | प्रतिनिधी
विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. राज्यभरातून नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेते अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी सुमारे 10 वाजता अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्काराच्या वेळी अजित पवार यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन शासकीय मानवंदना दिली जाणार आहे. या वेळी राज्य व केंद्रातील अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी, कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असून, त्यांच्या अंतिम निरोपासाठी संपूर्ण राज्य शोकमग्न झाले आहे.


