spot_img
spot_img
spot_img

अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्य व पिंपरी-चिंचवडसाठी मोठी हानी – खा. श्रीरंग बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी आहे, अशी भावना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.

अजितदादा पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले नेते होते. राज्यातील विकासकामांच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

दादांच्या संसदीय राजकारणाची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून झाली होती. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून 1991 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून त्यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले.

एकत्र काँग्रेस असताना अजितदादांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत बारणे म्हणाले की, नेता म्हणून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासातून राजकारणातील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या आठवणी मन हेलावून टाकणाऱ्या आहेत.

अजितदादांनी सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांना मोठे केले. स्पष्ट वक्ता, निर्भिड व्यक्तिमत्व, रोखठोक भूमिका आणि “जे पोटात तेच ओठावर” ही त्यांची ओळख होती, असेही बारणे यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड शहरावर अजितदादांचे नितांत प्रेम होते. नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी शहराला वेगळ्या उंचीवर नेले. जगभरात शहराची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.

अजितदादांचे अकाली निधन झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरही पोरके झाले आहे, अशी भावना व्यक्त करत बारणे म्हणाले की, त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.

अखेर खासदार श्रीरंग बारणे यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!