महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश देत हजारो महिलांची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड :
मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सोनाली संदीप गाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनाली ताईंच्या हाकेला प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक 23 मधील तसेच परिसरातील हजारो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या.
सोनाली संदीप गाडे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून, गरजू नागरिकांच्या अडचणींमध्ये धावून जाणे हा त्यांचा स्वभावच बनला आहे. हसतमुख व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणूक आणि सतत समाजहितासाठी झटणाऱ्या सोनाली ताई या प्रभागातील प्रत्येक घराघरात परिचित आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांनी निवडणूक लढविली होती. पक्षाने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत उमेदवारी दिली होती. त्यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली असली तरी अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवामुळे त्यांचे सामाजिक कार्य कुठेही थांबले नाही.
निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दुसऱ्या दिवसापासूनच सोनाली ताई यांनी पुन्हा एकदा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कामाला सुरुवात केली. महिलांचे संघटन, त्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि सक्षमीकरण यावर विशेष भर देत त्यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा एकदा महिलांची ताकद आणि संघटन आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रत्येक महिला भगिनीला भेटवस्तू देण्यात आल्या. पारंपरिक सणाचे महत्त्व जपत, आपुलकी, सौहार्द आणि आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. महिलांमध्ये उत्साह, समाधान आणि एकत्र येण्याची भावना यावेळी स्पष्टपणे दिसून आली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिकांचे स्वागत सोनाली ताई संदीप गाडे व सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडे यांनी केले. यावेळी बोलताना सोनाली ताई म्हणाल्या की, “निवडणुकीतील पराभव हा केवळ राजकारणापुरता असतो. समाजासाठी काम करताना पराभव किंवा विजय यापेक्षा सामाजिक भान आणि विकास महत्त्वाचा असतो. नागरिकांच्या विश्वासावर आपण समाजहिताचे कार्य अखंडपणे सुरूच ठेवणार आहोत.”
या कार्यक्रमातून सोनाली संदीप गाडे यांनी महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश दिला असून, भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



