चिंचवडमध्ये उत्साहात आयोजन; माजी सैनिकांच्या योगदानाचा गौरव
शबनम न्यूज | प्रतिनिधी
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे आणि महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत सामूहिकरीत्या सादर करण्यात आले.
या वेळी फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सैनिकांचा सन्मान करण्यात आला व देशसेवेसाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे होते.
अध्यक्षीय भाषणात मधुकर बच्चे म्हणाले, “सैनिक हा देशाचा अभिमान आहे आणि कायम राहील. त्यामुळे सैनिकांबद्दल जनतेने सदैव आदरभाव ठेवला पाहिजे. अनेक माजी सैनिक निवृत्तीनंतरही समाजात विविध सामाजिक कार्यांद्वारे देशसेवा करत असतात. अशा सैनिकांकडे असणारी शिस्त, कर्तृत्व आणि मूल्ये समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात. त्यामुळे माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान दिल्यास समाजाचा नक्कीच फायदा होईल.”
यावेळी उपस्थित सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत देशसेवेतील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे–सपकाळे यांनी केले.
कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे–सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, सलीम सय्यद, संस्थापक क्रांती कुमार कडूलकर, दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.


