शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपला तब्बल ८५ जागांवर यश मिळाले, तर भाजपविरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे २०१७ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी पक्षाला एवढ्याच जागा मिळाल्या होत्या. सत्तासंघर्षाच्या या राजकीय लढतीत आकडे जरी महत्त्वाचे असले, तरी या निकालात काही असे पराभव आहेत, जे केवळ उमेदवारांचे नसून थेट जनतेच्या अपेक्षांचे आणि विकासाच्या शक्यतांचे पराभव म्हणावे लागतील.
या निकालातील दोन धक्कादायक पराभव विशेषत्वाने अधोरेखित करावे लागतील. प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सरिता अरुण साने आणि प्रभाग क्रमांक ५ मधील माजी नगरसेविका प्रियंका ताई प्रवीण बारसे यांचा पराभव अनेकांना चटका लावणारा ठरला आहे. या दोन्ही महिला उमेदवारांनी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा दीर्घकालीन विकास डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक लढवली होती.
प्रियंका ताई प्रवीण बारसे यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन अत्यंत मूलभूत आणि जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते. सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा मजबूत व्हाव्यात, यासाठी ठोस आराखडा त्यांनी मांडला होता. प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाची दिशा स्पष्ट केली होती. मात्र, राजकीय डावपेच, समीकरणे आणि विरोधकांच्या रणनीतीसमोर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हा पराभव केवळ प्रियंका ताईंचा नसून, प्रभाग क्रमांक ५ मधील प्रत्येक विकासाभिलाषी मतदाराचा पराभव आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सरिता अरुण साने यांनी ‘सरिता साने सखी मंच’च्या माध्यमातून महिलांचे संघटन उभे केले. महिलांचे आरोग्य, स्वावलंबन आणि रोजगार यासाठी त्यांनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या प्रभागात सांस्कृतिक भवन उभारण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, जे प्रभागाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मैलाचा दगड ठरले असते. मात्र, या रणरागिणी महिला उमेदवारालाही राजकारणाच्या गुंतागुंतीत बळी जावे लागले.
या दोन्ही उमेदवारांची समान ओळख म्हणजे लोकांसाठी रात्रंदिवस धावणारे नेतृत्व, अडचणीच्या वेळी मदतीचा हात आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन. अशा सक्षम, संवेदनशील आणि काम करणाऱ्या महिलांचा पराभव हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे. आज कदाचित निकाल जाहीर झाला असेल, परंतु उद्या जेव्हा विकासाचे प्रश्न ऐरणीवर येतील, तेव्हा या दोन्ही प्रभागांतील मतदारांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती दिसून येत आहे.
या निकालातून एक कठोर सत्य समोर येते : पिंपरी-चिंचवडसारख्या महानगरातही मतदारांचा निर्णय स्थानिक प्रश्नांपेक्षा पक्षाच्या ‘ब्रँड’वर अधिक अवलंबून आहे. विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक नेतृत्व यांना दुय्यम स्थान मिळाले. त्यामुळे भाजपचा विजय हा पक्षाचा नसून विरोधकांच्या अपयशातून मिळालेला विजय अधिक वाटतो.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा आहे. सक्षम, जमिनीवर काम करणाऱ्या उमेदवारांना पुरेसे संघटनात्मक पाठबळ मिळाले का? प्रचाराची दिशा स्पष्ट होती का? स्थानिक नेतृत्वाला स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली गेली का? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच मिळाल्यास, असे पराभव पुढेही अटळ ठरणार आहेत.
आज कदाचित सत्ता एका पक्षाकडे गेली असेल, परंतु उद्या जेव्हा प्रभाग क्रमांक ५ आणि १५ मध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक सुविधांचे प्रश्न ऐरणीवर येतील, तेव्हा या निकालाचे खरे राजकीय मूल्यांकन होईल. तेव्हा हा विजय उत्सवापेक्षा एक हरवलेली संधी म्हणून अधिक आठवला जाईल, अशीच चिन्हे सध्याच्या परिस्थितीत दिसत आहेत.


