spot_img
spot_img
spot_img

तीन आठवड्यांत पुण्याला नवा महापौर

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर-उपमहापौर निवड; भाजपमध्ये जोरदार चुरस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर अवघ्या तीन आठवड्यांच्या आत पुणे शहराला नवीन महापौर मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने अधिकृतरीत्या सुरू केली असून, निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे पत्र महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविले आहे. या प्रक्रियेमुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौर व उपमहापौरांची निवड होणार, हे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होणार हे निश्चित मानले जात आहे. साहजिकच, भाजपकडूनच महापौर व उपमहापौर निवडले जाणार असल्याने या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी पक्षांतर्गत जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

महापौर निवडीच्या दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार असून, याच सभेत पुण्याचा ५८ वा महापौर निवडला जाणार आहे. शहराचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

यावेळी पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केली जाते. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या नगरसचिव कार्यालयामार्फत महापौर व उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जातो.

महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर पुणे महापालिकेचे सभागृह औपचारिकरित्या अस्तित्वात येईल आणि शहराच्या आगामी कारभाराला दिशा मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!