spot_img
spot_img
spot_img

पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात कचरा संकलनाचा बोजवारा

ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ह, ब, अ आणि ग प्रभागांमधील कचरा संकलनाचे ठेके असलेल्या ‘एजी अँन्थनी वेस्ट’ या खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पिंपरी कॅम्प व पिंपरी गाव परिसरात गेले कित्येक महिन्यांपासून कचरा संकलनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही नियमित कचरा संकलन होत नसल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही सुधारणा झालेली नाही. तक्रार केल्यानंतर कंपनीकडून “आमच्याकडे कचरा उचलण्यासाठी गाड्या आणि कर्मचारी संख्या कमी आहे, त्यामुळे रोज कचरा संकलन करणे शक्य होत नाही” असे उत्तर दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, कचरा संकलन नियमित न होत असतानाही महापालिकेकडून संबंधित ठेकेदार कंपनीला दरमहा नियमितपणे बिल अदा केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षात काम न करता केवळ वेळ मारून नेण्याचे काम सुरू असून, महापालिकेची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, तसेच महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी ठोस मागणी केली आहे.

“कचरा संकलन हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेने याबाबत तात्काळ कठोर पावले उचलावीत,” अशी भूमिका नगरसेवक डब्बू आसवानी यांनी मांडली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणती कारवाई केली जाते, याकडे पिंपरीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!