spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची रणधुमाळी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब भोईर, संदीप वाघेरे व शेखर चिंचवडे चर्चेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता पुन्हा एकदा अबाधित राखली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. एकीकडे महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते कोण होणार याकडे शहराचे राजकीय लक्ष वेधले गेले आहे.

विरोधी पक्षनेतेपद हे केवळ औपचारिक नसून, सत्ताधारी भाजपवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी या पदावर असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सक्षम, अनुभवी व आक्रमक नेतृत्वाची निवड होणार का, याबाबत विविध स्तरांत चर्चा रंगत आहे.

भाऊसाहेब भोईर : अनुभवाचा मजबूत दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी अग्रक्रमावर घेतले जात आहे. दीर्घकाळ महापालिकेतील सत्तेचा अनुभव, प्रशासनावर भक्कम पकड तसेच यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेला अनुभव हे त्यांचे मोठे बलस्थान मानले जाते.
महापालिकेच्या कारभारातील बारकावे, नियम, कायदे व प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता पाहता, सक्षम आणि परिणामकारक विरोधी पक्षनेते म्हणून भाऊसाहेब भोईर यांची निवड व्हावी, अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवकांकडून होत आहे.

संदीप वाघेरे : आक्रमक आणि नवा चेहरा

दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संदीप वाघेरे यांचेही नाव जोरकसपणे चर्चेत आहे. आक्रमक भूमिका, स्पष्ट वक्तृत्व आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव यामुळे संदीप वाघेरे यांच्याकडे राष्ट्रवादीचा नवा आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करत रस्त्यावर आणि सभागृहात लढा देण्याची तयारी असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली असून, तरुण व मध्यमवयीन कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेखर चिंचवडे : प्रशासनाचा अनुभव आणि सामाजिक आधार

भाजपमध्ये अनेक वर्षे कार्यरत राहून ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले व निवडणूक जिंकलेले शेखर चिंचवडे यांचे नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चिले जात आहे.
महानगरपालिका प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव, विकासकामांची जाण आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे शेखर चिंचवडे यांना समर्थकांचा भक्कम पाठिंबा आहे. भाजपच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती असल्याने सत्ताधाऱ्यांवर अधिक प्रभावीपणे टीका करता येईल, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

राष्ट्रवादीसमोरील आव्हान

भाजपच्या मजबूत संख्याबळासमोर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी विरोध उभा करायचा असेल, तर विरोधी पक्षनेतेपदावर योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अनुभव, आक्रमकता आणि संघटनात्मक ताकद या तिन्ही बाबींचा समतोल साधणारा नेता निवडला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता असून, सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!