पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करून विकासाच्या आश्वासनांची बरसात केली असली, तरी गेल्या पाच वर्षांत सत्तेत असताना नेमके काय केले, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
भाजपच्या जाहीरनाम्यात नदी सुधारणा, भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन, नागरी सुविधा आदी आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र सत्ता हातात असताना ही कामे का झाली नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत डॉ. कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पिंपरी गावात दिव्यांग व्यक्तीला झालेली मारहाण तसेच राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या घरावर जाऊन करण्यात आलेली शिवीगाळ याचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडवल्याचा आरोप केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा चौरंगा केला. आजही महिला भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही डॉ. कोल्हे यांनी दिला.
भाजपच्या कार्यकाळात महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून पालिकेला कर्जबाजारी करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अर्बन स्ट्रीट सीसीटीव्ही कॅमेरे, कुत्र्यांची नसबंदी, एसटीपी, डब्ल्यूटीई प्रकल्प अशा प्रत्येक कामात पैसे खाल्ले गेल्याचा दावा त्यांनी केला. “एसटीपीचे काम करणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर १५ कोटींवरून थेट १५ हजार कोटींवर गेला, हे विकासकाम म्हणायचे का?” असा सवाल करत थर्ड पार्टी ऑडिट झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. इंद्रायणी नदी फेसाळत असताना वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, “दहशतीमुळे आमची एकही भगिनी खच्ची होऊ देणार नाही. हा प्रकार अपघाती नसून नियोजनपूर्वक घडवून आणला आहे. राजकीय वारसा असल्याच्या अहंकारातून लोकशाहीचा गळा दाबण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”
माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही भाजपवर हल्लाबोल करत, “काही मंडळी दहशतवाद करत आहेत. त्यांनी गेल्या ३५ वर्षांत काय केले ते सांगितले, तर मी माझी उमेदवारी मागे घेईन,” असे थेट आव्हान दिले.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्यासह माजी नगरसेवक संतोष कुदळे, मीना नाणेकर, गिरिजा कुदळे, शामा शिंदे, शांती सेन, रंगनाथ कुदळे, श्रीरंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


