शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या चारही अनधिकृत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक सोसायटी धारकांसोबत संपन्न झाली. या बैठकीत अनिताताई संदीप काटे, बापू उर्फ शत्रुघ्न काटे, कुंदा संजय भिसे आणि संदेश रामचंद्र काटे यांचा सहभाग होता.
या बैठकीदरम्यान परिसरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटी धारकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत रस्ते, पार्किंग समस्या, कचरा संकलन, स्ट्रीट लाईट, सुरक्षा व्यवस्था तसेच उद्यान आणि खेळाच्या मैदानांसंदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न चारही उमेदवारांसमोर मोकळेपणाने मांडले.

चारही उमेदवारांनी प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे ऐकून घेत समस्या प्राधान्याने सोडविण्याची ठाम ग्वाही दिली. नागरिकांच्या सहभागातूनच सक्षम व जबाबदार नेतृत्व घडते, असे मत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सोसायटी धारकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “प्रभाग क्रमांक २८ चा विकास हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता कृतीतून दिसला पाहिजे. मूलभूत सुविधांसह स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जेदार नागरी सेवा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
बैठकीनंतर सोसायटी धारकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, चारही उमेदवारांवर विश्वास व्यक्त करण्यात आला. विकासाभिमुख भूमिका, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि संघटित नेतृत्वामुळे या चारही उमेदवारांना प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी नक्कीच मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे प्रभाग क्रमांक २८ मधील निवडणूक वातावरण अधिक गतिमान झाले असून, भाजपच्या उमेदवारांचा प्रचार अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


