शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये वसंत बोराटे, आश्विनी ताई जाधव, रूपालीताई आल्हाट आणि विशाल आहेर यांचा समावेश आहे.
अर्ज दाखल करण्यावेळी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. पक्षाच्या झेंड्यांनी आणि घोषणा देत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
हे चारही उमेदवार सामाजिक कार्य, नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासाठी ओळखले जात असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार करत ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला व युवकांसाठी विशेष योजना राबवण्यावर त्यांचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रभाग क्रमांक २ मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडवणे, विकासकामांना गती देणे आणि पारदर्शक प्रशासन देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू,” अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली.
अर्ज दाखल प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एकजुटीचे दर्शन घडवत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचाराची अधिकृत सुरुवात केल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


