शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधून नम्रता रवी भिलारे यांनी आज ग प्रभाग कार्यालय, थेरगाव येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे भारतीय जनता पक्षाकडून नम्रता रवी भिलारे यांनाच अधिकृत उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
प्रभाग क्रमांक २३ च्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून नम्रता रवी भिलारे या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता तसेच महिलांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.
प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त होत असून, त्या दृष्टीने नम्रता रवी भिलारे यांच्याकडे विश्वासाने पाहिले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या वेळी उपस्थित आमदार शंकर जगताप यांनी नम्रता भिलारे यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची प्रशंसा करत, प्रभागाच्या विकासासाठी त्यांना सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. एकूणच प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रचाराला आता वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.


