शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध केला होता. या भूमिकेमुळे पक्षाने दोन्ही गटांच्या एकत्रिकरणासाठी स्थापन केलेल्या समितीतून त्यांना वगळण्यात आले. या निर्णयामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा अद्याप अधिकृतपणे स्वीकारण्यात आलेला नव्हता. मात्र आज प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली.
दरम्यान, काल खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना तातडीने मुंबईला चर्चेसाठी बोलावले होते. या भेटीनंतर त्यांनी संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. तसेच “मी राष्ट्रवादीत होतो आणि आहे” असे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले होते.
राजीनामा जाहीर करताना प्रशांत जगताप म्हणाले,
“आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार. २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, ते कोणत्याही पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी. २७ वर्षांनंतरही हेच माझे एकमेव ध्येय आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच राहील. आजपर्यंत निष्ठेने साथ देणाऱ्या आणि पुढील संघर्षातही माझ्यासोबत राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.”
प्रशांत जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील काळात प्रशांत जगताप कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


