शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माजी नगरसेविका मीनल यादव यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काल शहरातील अनेक दिग्गज माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक १४ मधील माजी नगरसेविका मीनल यादव यांचा भाजप प्रवेश हा शिवसेना पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक १४ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मीनल यादव यांनी स्पष्ट केले. भाजपच्या विकासाभिमुख विचारसरणीवर विश्वास ठेवून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या प्रकारे देश आणि राज्याचा विकास होत आहे, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहराचा आणि माझ्या प्रभागाचा विकास व्हावा, या भावनेने मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असे मीनल यादव यांनी यावेळी सांगितले.
या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून आगामी महापालिका निवडणुकीत याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची चिन्हे आहेत.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे , चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 22 माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
मीनल यादव यांच्या या पक्षप्रवेशाचा विचार केला तर त्यांनी फक्त आपल्या प्रभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.


