शिवसेना समन्वयक विजय गुप्ता यांचा सर्वपक्षीयांना थेट सवाल..
ऐनवेळी पक्षात आलेल्या बलाढ्यांना तिकीट; वर्षानुवर्षे झटलेल्या कार्यकर्त्यांची उपेक्षा…
शबनम न्यूज:प्रतिनिधी
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून येणाऱ्या बलाढ्य उमेदवारांना तिकीट दिले जाते, मात्र वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी परखड टीका शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी केली आहे.
विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रचार करतात, झेंडे लावतात, सभा-मेळावे घेतात, सतरंज्या उचलतात आणि पक्ष वाढवण्यासाठी स्वतःचे आयुष्य बाजूला ठेवतात. मात्र निवडणुकीच्या वेळी पक्ष त्यांच्या योगदानाचा विचार करत नाही. उलट, ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते. अशा परिस्थितीत निष्ठावान कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष काही वर्षांपूर्वी एकाच युतीत होते. त्यावेळी कार्यकर्ते एकत्र काम करत होते. मात्र आता तेच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. गेल्या नऊ वर्षांत कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात संघर्ष केला, आरोप-प्रत्यारोप केले, प्रचारात पुढे-मागे धावपळ केली. आज परिस्थिती बदलली, पण त्या कार्यकर्त्यांचे भवितव्य मात्र अनिश्चितच आहे.
पक्षांचे नेते वेळोवेळी पक्षांतर करतात, सत्ता आणि संधी पाहून भूमिका बदलतात. मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांना मात्र प्रत्येक वेळी नव्या समीकरणांशी जुळवून घ्यावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होत असून, राजकारणातील निष्ठेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त झालेल्या या भावना केवळ एका पक्षापुरत्या मर्यादित नसून, सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, असेही विजय गुप्ता यांनी स्पष्ट केले.



