पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक जानेवारी महिन्यात संपन्न होत असून, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये माजी नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत, विकासकामांचा आढावा घेतला आणि पुढील काळातील विकासाचा आराखडा मांडला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५ गवळीनगर येथील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी इच्छुक उमेदवार असलेल्या माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आज तुकाई मातेच्या आशीर्वादाने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. साईसिद्धनगर येथे स्थानिक रहिवासी व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुकाई मातेचे मंदिर येथे पूजा-अर्चा करण्यात आली. यानंतर नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला विधिवत सुरुवात करण्यात आली.
प्रचाराच्या सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रियांका बारसे यांनी जनसंपर्कावर भर देत प्रचाराला वेग दिला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उमेदवारांच्या मुलाखती, बैठका आणि प्रचार फेऱ्यांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत असून, आगामी दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रसंगी तुकाई मातेचा “उदो उदो” करत उपस्थितांनी जल्लोषात घोषणा दिल्या—“एक बार फिरसे प्रियांका बारसे”—अशा घोषणा देत सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाला साईसिद्धनगर येथील आनंद दौंड, बडदेकाका, गोगावले काका, कुंभार दादा, संदेश दादा, पिल्लेकाका तसेच अनेक महिला कार्यकर्त्या, बारसेताईंच्या मैत्रिणी आणि बारसे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आता थांबायचं नाही” असा निर्धार करत साईसिद्धनगरपासून प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली.






