शबनम न्यूज
पिंपरी, :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर उत्तम समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार अत्यंत जबाबदारीने पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आढावा बैठक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप जिल्हाधिकारी अनिल पवार, अर्चना पठारे, पल्लवी घाटगे, किरणकुमार काकडे, सुरेखा माने, हिम्मत खराडे, सुप्रिया डांगे, दीप्ती सूर्यवंशी, हनुमंत पाटील, सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त सचिन पवार, संदीप खोत, अतुल पाटील, डॉ. चेतना केरुरे, व्यंकटेश दुर्वास, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरण राज यादव, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे, तानाजी नरळे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, गौरी तेलंग, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, दिलीप भोसले, वैशाली ननावरे, चंद्रकात मुठाळ, सुनील शिंदे, शिवाजी चौरे, विजय सोनवणे, हेमंत देसाई, सतीश वाघमारे, सोहम निकम, सुर्यकांत मोहिते, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, प्रत्येक प्रभागातून ४ उमेदवार निवडून द्यायचे असून, प्रत्येक मतदाराला ४ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. याच पद्धतीने ईव्हीएमची रचना आणि इतर तांत्रिक बाबींचे नियोजन असणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी अत्यंत संवेदनशील असणार असून शहरात सुमारे १७ लाख मतदार असून त्यांच्या नियोजनासाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत. कामात सुसूत्रता आणण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर योग्य मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी नव्याने काही मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रभागातील मतदान केंद्र त्याच प्रभागात राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांशी समन्वय साधून गर्दीचे नियोजन व कायदा-सुव्यवस्था राखली जावी. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे, संवेदनशील व आदर्श मतदान केंद्रे निश्चित करणे आणि मतदान साहित्याची गुणवत्ता तपासणे या बाबींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मतमोजणीसाठी जागा अपुरी पडत असल्यास शाळा, कॉलेज किंवा मंगल कार्यालयांची पाहणी करून त्या ठिकाणी मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याची सोय करावी, अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी दिल्या.
याशिवाय, मतदार याद्यांबाबत आलेल्या सुमारे १ लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, चुकीच्या प्रभागात नावे असल्याच्या तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत. दुबार मतदारांची पडताळणी प्रभाग स्तरावर सुरू असून हे काम २७ तारखेपर्यंत पूर्ण करून त्याच दिवशी मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपल्या स्तरावर निवडणूकीचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणतीही अडचण आल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कामकाज प्रामाणिकपणे व जबाबदारीने पूर्ण करावे, असे निर्देश देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिले.
बैठकीत निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका निवडणूक कार्यक्रमाची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.



