शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी महापालिकाकडून अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून शहरातील प्रभागनिहाय मतदारसंख्येचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
अंतिम आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार असून, प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वांत कमी ३३ हजार ३३ मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रभागनिहाय मतदारसंख्येमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, प्रारूप मतदारयादीवर प्राप्त झालेल्या हरकतींची सखोल तपासणी करत महापालिकेने दुरुस्तीची प्रक्रिया राबवली. संबंधित विभागाने प्रत्येक हरकतीची बारकाईने छाननी करून आवश्यक बदल केले आणि त्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली.
शहरात सुमारे ९२ हजार दुबार मतदार नोंदी आढळून आल्याने प्रशासनाने विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली. या अंतर्गत प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेटी देऊन तपासणी करण्यात आली. पडताळणीनंतर चुकीच्या व दुबार नोंदी हटवून मतदारयादी अद्ययावत करण्यात आली आहे.
तसेच काही प्रभागांतील मतदारांची नावे चुकून इतर प्रभागांमध्ये नोंदवली गेल्याचेही निदर्शनास आले होते. या त्रुटी दुरुस्त करून मतदारयादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.



