तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी
शबनम न्यूज: प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मौजे पारगाव मंगळूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी वन विभागाकडे तातडीने ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात खासदार कोल्हे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांना अधिकृत पत्र पाठवले असून, मौजे पारगाव मंगळूर परिसरात मानव–वन्यजीव संघर्ष वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे यापूर्वीही अनेक घटना घडल्या असून, सद्य घटनेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
खासदार कोल्हे यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, वन विभागाने तात्काळ प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये बिबट्याला तात्काळ पिंजऱ्यात पकडणे, परिसरात गस्त वाढवणे, तसेच दीर्घकालीन प्रतिबंधात्मक योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच मानव–बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वन विभागाच्या समन्वयाने प्रभावी धोरण राबवावे, अशी अपेक्षाही खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या पत्रामुळे माळेवाडी व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, वन विभागाकडून लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



