spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ जागृती अभियान

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ गौरव रथातून जनजागृती

शबनम न्यूज: प्रतिनिधी

देव–देश–धर्म आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधणारे “विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान” हे अभियान पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्यात येत आहे. अभियानची सुरूवात भोसरी विधानसभा मतदारसंघात होणार असून, दि. 16 ते 25 डिसेंबरदरम्यान हा जागर होत आहे. सलग 10 दिवस चालणाऱ्या या अभियानात भोसरीतील 12 प्रभागांमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाचा संदेश घराघरांत पोहोचवला जाणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांची ही संकल्पना असून, या अभियानाचे मुख्य आकर्षण ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ गौरव रथ आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वागतासाठी हा रथ विविध प्रभागांतून प्रवास करणार आहे. हिंदुत्व, शौर्य आणि भारतीय संस्कृतीचा जागर घडवणारा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार असून, विकास आणि हिंदुत्व यांची सांगड घालणारे देशातील पहिले अभियान म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेले जगातील सर्वात उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प म्हणजेच “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” हे पिंपरी-चिंचवड शहराची नवी ओळख ठरत असून, शिव–शंभूप्रेमींसाठी ते एक प्रेरणास्थान आणि शक्तीस्थळ बनले आहे.

या अभियानामागील भूमिका स्पष्ट करताना, हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. देव–देश–धर्म आणि विकास या चारही घटकांचा समतोल साधल्यास विकसित राष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अभियानाची उद्दिष्टे :
भाजपा सरकारच्या काळात झालेल्या मूलभूत विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, सर्वसमावेशक हिंदुत्वाचा आत्मविश्वास निर्माण करणे, सर्व धर्मनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ घटकांना विकासाच्या समान व्यासपीठावर आणणे आणि पिंपरी-चिंचवडला “विकास + हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदर्श शहर” म्हणून उभे करणे, अशी उद्दिष्टे या अभियानामागे आहेत.

संघटनात्मक बळावर जनजागृती :
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पन्ना प्रमुख ते प्रभाग अध्यक्षांपर्यंतच्या संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून घराघरांत संपर्क साधण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. पक्षाची संघटनशक्ती अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, मतदार संघातील प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे आशिर्वाद घेवून अभियान सुरू होईल. त्यानंतर पालक-विद्यार्थी संवाद, शाळांमध्ये सोयी-सुविधा पाहणी, प्रभागातील उच्चशिक्षीत तज्ञ-डॉक्टर-सीए यांच्याची ‘चाय पे चर्चा’, महिला बचतगट सदस्यांची चर्चा, दुपारी रथ यात्रा, रॅली, महाआरती आणि सांगता सभा असे सलग 10 दिवस 12 प्रभागांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे.  

विकासात्मक हिंदुत्व म्हणजे नेमकं काय?
विकासाभिमुख हिंदुत्व म्हणजे केवळ धार्मिक ओळख नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा, सामाजिक समरसता आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा समतोल साधणारी विचारधारा होय. पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांतून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे. 1. वारकरी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड : वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा संकल्प आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची स्वप्नपूर्ती — हेच विकासाभिमुख हिंदुत्व. 2. ग्रामसंस्कृतीचे जतन आणि शाश्वत विकास : ग्रामसंस्कृतीचे जतन, गावठाणांचे संवर्धन आणि समाविष्ट गावांचा नियोजित विकास म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व. 3. शिव–शंभू विचारांचे प्रतीकात्मक रूप : शिव–शंभूंच्या विचारांचे जागतिक प्रतीक असलेले “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” आणि जगद्गुरु तुकोबाराय संतपीठाची उभारणी — हे विकासाभिमुख हिंदुत्व. 4. शिक्षण, संविधान आणि गोसंवर्धन : आयआयएम, सीओईपीसारख्या शैक्षणिक संस्थांसह संविधान भवनाची उभारणी आणि गोसेवा–गोसंवर्धनाचा विचार म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व. 5. क्रीडा, पर्यावरण आणि जैवविविधता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी–कुस्ती संकुल, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या भावनेतून बायोडायव्हर्सिटी पार्कची संकल्पना — हे विकासाभिमुख हिंदुत्व. 6. शाश्वत विकासाचे स्पष्ट व्हिजन : गावठाणांचे संवर्धन आणि समाविष्ट गावांचा दीर्घकालीन, संतुलित विकास म्हणजे विकासाभिमुख हिंदुत्व. 7. भक्तीमार्ग आणि नागरी विकासाची सांगड : वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग, चऱ्होली–चिखली परिसराला ‘क-वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा आणि चिखली–मोशी–चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरचा विकास — हे विकासाभिमुख हिंदुत्व आहे, अशी सर्वसमावेशक व्याख्या करण्यात आली आहे.

“हिंदुत्व ही केवळ ओळख नसून ती आपल्या संस्कृतीची, मूल्यांची आणि राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. विकासाशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे आणि हिंदुत्वाशिवाय विकास दिशाहीन ठरतो. पिंपरी-चिंचवडला विकास आणि संस्कृती यांचा समतोल साधणारे आदर्श शहर बनवण्यासाठी हे अभियान जनआंदोलन म्हणून राबवले जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात लोकसंपर्क अभियान राबवण्याच्या सूचना आहेत. त्याअनुशंगाने ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व जागृती अभियान’’ राबवतो आहेत. आपल्या भावी पिढ्यांसाठी, शहराच्या प्रगतीसाठी पिंपरी-चिंचवडकरांनी या अभियानात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!