माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र ५ मधील गवळीनगर येथील नागरिकांना घराजवळ प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लवकरच महापालिकेचे जिजाऊ क्लिनिक सुरू होणार आहे. “मोफत आरोग्य सेवा हाच माझा संकल्प” असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापालिकेच्या २०२३ च्या अर्थसंकल्पात ‘जिजाऊ क्लिनिक’ या नव्या संकल्पनेची घोषणा झाल्यानंतर, गवळीनगर प्रभागात हे क्लिनिक व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गवळीनगरमध्ये हॉस्पिटलसाठी आरक्षित जागा असली तरी ती अद्याप पूर्णपणे महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्याने तेथे रुग्णालय उभारणे शक्य झाले नव्हते. परिणामी, प्रभागापासून दूर असलेल्या महानगरपालिकेच्या दवाखान्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा परिस्थितीत जिजाऊ क्लिनिक सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, किरकोळ जखमा अशा आजारांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तसेच इतर मोठ्या रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होते. जिजाऊ क्लिनिकमुळे घराजवळच प्राथमिक उपचार उपलब्ध होणार असल्याने मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल, तसेच नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल.
याशिवाय, आशा वर्कर यांना लहान मुलांचे लसीकरण, गरोदर महिलांचे मार्गदर्शन यासाठी अनेकदा घरोघर जावे लागते. प्रभागातच सुसज्ज आरोग्य केंद्र उपलब्ध झाल्यास त्यांना कामासाठी हक्काचे ठिकाण मिळेल. पोलिओ लसीकरणासारख्या मोहिमांसाठी मंदिर, सोसायटीचे पार्किंग अशा तात्पुरत्या जागांवर अवलंबून राहावे लागते, अशावेळी जिजाऊ क्लिनिकचा उपयोग अत्यंत मोलाचा ठरणार आहे.

या उपक्रमाला आकार देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी गोफणे साहेब, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी ढगे साहेब तसेच जिजाऊ क्लिनिकचे काम पाहणारे भोईर सर यांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल प्रियांका ताई बारसे यांनी सर्वांचे आभार मानले. गवळीनगरमधील नागरिकांसाठी जिजाऊ क्लिनिक हे आरोग्यसेवेचे नवे दालन ठरणार असून, ‘घराजवळ आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.



