शबनम न्यूज
आमदार अमित गोरखे यांच्या विधानपरिषद सदस्य म्हणून पहिल्या वर्षातील कार्याचा आढावा मांडणाऱ्या “कर्तव्यपथाचे ३६५ दिवस” या वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन आज नागपूर येथील मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले.*
या कार्यअहवालामध्ये आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषद सदस्य झाल्यापासून वर्षपूर्तीपर्यंत केलेल्या विविध विधीमंडळीय हस्तक्षेप, चर्चांमधील सहभाग, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधलेले विषय, तसेच सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. जनतेशी थेट संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका या अहवालातून स्पष्टपणे समोर येते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा तसेच सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा आमदार अमित गोरखे यांचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेची कायदानिर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या सभागृहाचे सदस्य म्हणून विविध चर्चांमध्ये श्री. अमित गोरखे यांनी घेतलेला सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचा विधानपरिषद सदस्य ते तालिका सभापती पदापर्यंतचा प्रवास अत्यंत कष्टातून घडलेला असून, त्या प्रवासातून तयार झालेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यअहवालात स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.”*
या कार्यक्रमातून आमदार अमित गोरखे यांच्या पहिल्या वर्षातील लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याचा सुसंगत, पारदर्शक आणि दस्तऐवजीकृत आढावा जनतेसमोर आला असून, भविष्यातील अधिक प्रभावी कामकाजाचा दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.या प्रसंगी भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप, पिंपरी–चिंचवड भाजप जिल्हाध्यक्ष shatruggha काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.



