खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे-उरूळी कांचन या प्रस्तावित बाह्यवळण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची मोठी जमीन संपादित केली जाणार आहे. या मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसून या मार्गात बदल, फेरसर्वेक्षण करण्याची त्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन या मार्गाचा फेर सर्व्हे करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा एक प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग पुणे शहराच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पुणे-अहिल्यानगर नवीन मार्गाचा भाग म्हणून आणला जात आहे, मात्र या मार्गामुळे बाधित होणाऱ्या गावातील शेतकरी आणि स्थानिकांकडून याला तीव्र विरोध होत आहे. याच विरोधामुळे मार्गाच्या आखणीत बदल करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याची मागणी त्यांनी केली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे ते ऊरळी कांचन हा नवीन बाह्यवळण रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाचे सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाबाबतचे नोटीफिकेश प्रसिद्ध केले आहे. मावळ, खेड, हवेली तहसील कार्यालय हद्दीतील गावांमधून हा मार्ग जाणार आहे. देहूगाव नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलनगर, माळीनगर, झेंडेमळा, बोडकेवाडी, हगवणे, काळोखे मळा, सांगुर्डे, इंदोरी पुढे धानोरे, सोळू, मोई, चिंबळीमधून हा मार्ग जाणार आहे. या गावांमधील शेकडो हेक्टर जमीन संरक्षण, रेल्वे, गॅस पाईपलाईन, रिंगरोड, एमआयडीसी, पुणे-राष्ट्रीय महामार्गासाठी यापूर्वी संपादित केली आहे. आता प्रस्तावित तळेगाव दाभाडे ते ऊरळी कांचन रेल्वे मार्गासाठीही जमीन भूसंपादन करावे लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा रेल्वे मार्गाला विरोध नाही. परंतु, याचा दुसऱ्यांदा सर्व्हे करावा. रेल्वे मार्गात बदल करावा. त्यात शाळा, घरे, शेतीक्षेत्र प्रभावित होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा भावनांचा विचार करुन आवश्यक बदल करावा. प्रस्तावित रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. शेतकऱ्यांचे नुकसान न करता बाजूने सर्व्हे करावा, असे खासदार बारणे म्हणाले.



