शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील ई क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील निरंकारी भवन, सह्याद्री कॉलनी मागील शिवनगरी सोसायटीत पिण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या भागातील माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी त्वरित उपस्थिती दर्शवत सर्व घटनेची माहिती घेत तत्काळ पाणीपुरवठा अधिकारी अरुण अरगडे यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या निदर्शनास आणून देत याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या भागात प्रियांका ताई बारसे यांचे अनेक विद्यार्थी वास्तव्यास असल्याने नागरिकांनी नेहमीप्रमाणेच ही समस्या त्यांच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवली. विद्यार्थ्यांनी पाण्याचा व्हिडिओ पाठवताच प्रियांका ताईंनी घरात न थांबता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि पाईपलाईनचे पाणी तत्काळ बंद करण्यात आले.
त्यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत या ठिकाणी भिंतीचा कट्टा नसल्याने रस्त्याकडून वेगाने पाणी कॉलनीमध्ये घुसते, तसेच खाली स्ट्रॉम वॉटर लाईनचे चेंबर नसल्याचे निदर्शनास आले. या गंभीर त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना भिंत बांधणे व स्ट्रॉमवॉटर चेंबर उभारण्याच्या स्पष्ट सूचना देणार असल्याचे प्रियांका ताई बारसे यांनी सांगितले.
नागरिकांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देत, तातडीने उपाययोजना करून दिल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.




