शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) ५ वी महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्यासह PMRDA चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात मागील ४ थ्या बैठकीच्या अनुपालन अहवालाच्या सादरीकरणाने झाली. पुणे महानगर प्रदेश क्षेत्राकरिता एक उत्कृष्ट आणि व्यवहार्य ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करण्याच्या स्पष्ट सूचना मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. PMRDA मार्फत मंजूर झालेल्या विविध विकासकामांची सद्यस्थिती आणि विस्तृत माहितीही सर्व सदस्यांसमोर सादर करण्यात आली.
आमदार सुनील शेळके यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीअभावी थांबलेल्या कामांचा मुद्दा ठामपणे मांडला. ग्रामीण क्षेत्रातील रस्ते PMRDA अंतर्गत समाविष्ट करून आवश्यक निधी उपलब्ध करण्याची त्यांनी मागणी केली. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिले.

पुणे महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात येणारी टीपी स्कीम जलदगतीने पूर्ण व्हावी आणि त्यासाठी वेळमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. वडगाव नगरपंचायत हद्दीत PMRDA च्या माध्यमातून क्रीडासंकुल उभारण्याचा प्रस्ताव मांडताच मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी PMRDA अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील, आमदार तानाजी सावंत, शंकर मांडेकर, सिद्धार्थ शिरोळे, अमित गोरख, PMRDA सदस्या दिपालीताई हुलावळे, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश देशमुख, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नागपूर येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी मावळ परिसराच्या विकासासंबंधी मुद्दे प्रभावीपणे मांडत गावागावांत विकासकामांना गती देण्यावर भर दिला.



