शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. आज सकाळी हवेली तालुक्यात एका महिलेवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने त्या महिला या हल्ल्यात बचावल्या असून, या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवेली तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने सुरू असल्याची माहिती आहे. या परिसरातील रहिवासांसाठी हे धोकादायक परिसर ठरले आहे. या सर्व घटनेची दखल शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली असून, सदर परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्य वनरक्षक अधिकारी आशिष ठाकरे यांच्याकडे खासदार अमोल कोल्हे यांनी निवेदन देऊन सदर परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्वभागातील वाडेबोलाई, अष्टापूर, शिंदेवाडी, हिंगणगाव, न्हावी, सांगवी ,पिंपरी, सांडस, शिरसवडी, भिवरी, डोंगरगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर दररोज होत आहे. शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरतात तर सर्वसामान्य नागरिकही सतर्कतेत जगत आहेत. त्यामुळे येथील बिबटे पकडण्यासाठी या परिसरात मुबलक प्रमाणात पिंजरे लावणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याने या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे.



