शबनम न्यूज | प्रतिनिधी
राजगुरूनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील गोद्रा येथील आंतरराज्य टोळीतील तीन जणांना पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने अटक केली. या टोळीने आळेफाटा, मंचर, सिन्नर येथे गुन्हे केल्याचे; तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकमधून पाच लाख रूपयांचे टायर चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना होलेवाडी येथे रात्री पावणेदहा वाजता एक टेम्पो उभा असल्याचे आढळून आले. त्यामध्ये पाच जण होते. त्याचेकडे चौकशी करण्यात येत असताना त्यातील दोन जण पळून गेले. त्यापैकी इरफान अब्दुलअमीद दुर्वेश, (वय ४२), मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय २१) आणि उमरफारूख अब्दुलसत्तार (वय ३६ रा. पोलंड बाजार, वालेपडीलया, नं. १, गोद्रा, गुजरात) या तिघांना पकडण्यात आले.
त्यांच्याकडे गज, रॉड, कटावणी, बॅटरी, लोखंडी धार असलेली पट्टी, कटर, चॉपर असा मुद्देमाल आढळून आला. त्यांच्याविरूद्ध आळेफाटा, मंचर, सिन्नर आणि अन्य ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.



