– कार्यकर्तेच ठरवणार, महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा ‘ऑन फायर मोड’ वर आहे. पक्षाकडून इच्छुक अर्ज वितरण सुरू झाल्यानंतर आज एकाच वेळी मतदार संघातील 12 प्रभागांमध्ये पक्षाचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग कमिटीची बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे, कमिटी सदस्यांकडून उमेदवार कोण असावा? याबाबत गोपनीय अभिप्राय घेतले आहेत. त्यामुळे भाजपाचे सक्रीय कार्यकर्तेच महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार ठरवतील, असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.
भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बैठकी दरम्यान प्रभागातील संभाव्य उमेदवारांविषयी गोपनीय अभिप्राय घेण्यात आला. संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी आवश्यक सूचना, अपेक्षा व सामाजिक समीकरणांचा अभ्यासही करण्यात आला. हिवाळी अधिवेशनानंतर प्रभागस्तरीय कोअर कमिटीसोबत प्रत्यक्ष संवाद साधत पुढील रणनीती अंतिम केली जाणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी किमान चार-पाच इच्छुक आहेत. तिकीट एकाच उमेदवाराला मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य नाराजी टाळणे आणि एकजुटीने ‘कमळ’ चिन्हाचा प्रचार करावा. उमेदवारी किंवा प्रभागातील कारणांवरुन मतभेद असतील, तर त्यावर सामंजस्याने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांचे काम प्रभावीपणे केले. त्यांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानंतर महापालिका सत्ताकाळात अनेक प्रमाणिक समर्थकांनी मानाची पदेही देण्यात आली. त्यानंतर 2019 आणि 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी देण्याची भूमिका आहे. त्या अनुशंगाने कार्यकर्त्यांमधून उमेदवार निश्चित व्हावा, अशी सर्वसमावेशक भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे, अशी माहिती सरचिटणीस विकास डोळस यांनी दिली.
प्रत्येक घरापर्यंत भाजपा आणि कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी संघटनात्मक कार्याला आम्ही गती दिली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने, ‘‘कमळ हाच उमेदवार’’ या भावनेने काम करीत आहेत. भाजपाच्या प्रभागनिहाय मजबूत रचना, समन्वयक प्रणाली आणि सूक्ष्म मोर्चेबांधणीच्या बळावर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सलग विजय मिळवला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीतही ही यंत्रणा निर्णायक ठरली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतसुद्धा प्रभाग यंत्रणा गतीमान केली आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच प्रभाग कमिटी सदस्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.



