spot_img
spot_img
spot_img

मुग्धा- प्रथमेश जोडीची ‘मर्मबंधातली ठेव’ मोरयाभक्तांच्या हृदयाच्या मखमली पेटीत जतन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महासाधू मोरया गोसावी यांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित उत्सवात कालच्या दुसऱ्या दिवशी सारेगमप लिटल चॅम्प्स पहिल्या पर्वाची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या जोडीने आपल्या ‘मर्मबंधातली ठेव’ या संगीत रजनीच्या कार्यक्रमाने शब्दश: मंत्रमुग्ध केले.

मानवी जीवनात काही वेळा कधी कधी अगदीच अनपेक्षितरित्या कळत-नकळत एखाद्यावर जीव जडतो, इतका की तो/ती आपले कुणीही नसताना सुद्धा ते आपल्याला जणू रक्ताच्या नात्याइतकेच जवळचे होतात.
असेच दोन नावे म्हणजे झी टीव्हीवरील सारेगमपच्या पहिल्या पर्वातल्या लिटल चॅम्प्स पंचरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या गायकातले माऊ आणि लाडू म्हणून ओळखले जाणारे अलिबागची मुग्धा आणि रत्नागिरीचा प्रथमेश ही जोडी.
त्या पाचजणांतली सर्वात लहान म्हणून सर्वांची लाडकी झालेली आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांची मुलगी झालेली मुग्धाने आपल्या बालपणीचा प्रथमेशदादा सोबत सप्तपदी चालण्याचा निर्णय घेतला आणि संगीतवेडा महाराष्ट्र या बातमीने मनापासून खुश झाला.

लग्नानंतर प्रथमच चिंचवडमध्ये आलेल्या या जोडीला काल डोळे भरून पाहण्यासाठी आणि कानात त्यांचे दैवी सप्तसुरु साठवण्यासाठी काल मोरया मंदिर परिसरात विक्रमी गर्दी झाली होती.

संपूर्ण परिसर अक्षरशः पॅक झाला होता, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात होते ते कुतूहल आणि कौतुक त्या सगळ्यांना न्याय देताना या जोडीने आपल्या सुरेल गायनाने खरोखरचं मंत्रमुग्ध केले, खिळवून ठेवले.

आबालवृद्ध या कार्यक्रमात एकाच जागी शेवटच्या गाण्यापर्यंत बसून होते याहून अधिक योग्य वर्णन या कार्यक्रमाचे होऊच शकत नाही.

श्रीराम भजनाने सुरुवात झालेल्या या संगीत रजनीत या भजनाच्या अंतिम कडव्यात प्रथमेशने उपस्थित श्रोत्यांना ठेका धरायला लावला आणि हा सूर शेवटपर्यंत म्हणजेच ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवी पर्यंत.

यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे या जोडीने एकही हिंदी गाणं घेतलं नाही, नवे गाणे नव्हते पण तरीही एकही श्रोता जागेवरून उठला नाही की वैतागला नाही.

प्रभो विघ्नहर्ता, तुज मागतो मी आता, जय शंकरा करुणाकरा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सोहम हर डमरू बाजे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, काळ देहासी आला खाऊ अशा एकापेक्षा एक अजरामर गाण्यांची ही मैफल रसिकांच्या मनात चिरकाल वसणार यात काहीच शंका नाही.

याच मैफलीतली एक विशेष बाब म्हणजे प्रथमेशने राधास्वामी लक्ष्मीरमणा हे कानडी भजन गायला सुरुवात केली आणि ही भाषा समजत नसताना देखील अनेक रसिकांनी मनापासून ताल धरला यातच एक चार-पाच वर्षांच्या छोटुली मुलीने जो ठेका पकडला तो पाहून श्रोत्यांसह सहभागी कलाकार सुद्धा चकित झाले, त्यामुळेच कदाचित आपल्या रसाळ पण प्रासंगिक अभ्यासू निवेदनाने रसिक श्रोत्यांना वेगळाच आनंद देणाऱ्या विघ्नेश जोशी या अभिनेता असणाऱ्या निवेदकाने आपल्याला मिळालेली मोरयाची महावस्त्र म्हणून मानाची मिळालेली शाल तिला सप्रेम देताच उपस्थित श्रोत्यांनी उभे राहून दाद देताच हा प्रसंग खरोखरचं अविस्मरणीय झाला.

या अवीट मैफलीचे निवेदन विघ्नेश जोशी यांनी यथार्थ करत आपली अवीट छाप पाडली. तबल्यावर रुपक वझे,
हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी, व्हायोलीनवर उदय गोखले तर पखवाजाची साथ प्रथमेश देवधर यांच्यासह ताल व टाळ याची साथ विश्वास कळमकर या सहकलाकारांनी अप्रतिमरित्या देत हा कार्यक्रम खूपच उंचीवर नेला.

अशा मैफली कधीच संपू नयेत असे भाबड्या मनाला वाटत असले तरी जे वाटते तेच होते असे नसते ना, त्यामुळेच ही मैफिल मनात साठवत श्रोते महोत्सव आयोजकांना मनोमन धन्यवाद देत घरी परतले.

आजच्या या संगीत रजनीसाठी सुद्धा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे हे रसिक म्हणून तसेच यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते कलाकारांचा सन्मान केला गेला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!