खासदार श्रीरंग आप्पा बारणे, प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड – शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आयोजित मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार 2025 देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास नागरिकांचा, प्रेक्षकांचा व वाचकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला. शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संपादिका शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते तर शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, माजी उपमहापौर शैलाजाताई मोरे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, मनिषा ताई पवार, सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, आयेशा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शबनम न्यूज ही वृत्तसंस्था मागील नऊ वर्षापासून सातत्याने पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. आपले काम प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण ठेवल्याने त्यांनी आपल्या कामात नावलौकिक मिळविला आहे. तसेच फक्त पत्रकारिता न करता त्यांनी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा जो मागील तीन वर्षांपासून उपक्रम राबविला आहे तो उल्लेखनीय आहे”.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शबनम न्यूज ही वृत्त संस्था पत्रकारितेसोबतच सामाजिक कामातही अग्रेसर असल्याचे या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून दिसत आहे. शबनम न्यूज या वृत्त संस्थेने पत्रकारितेसोबतच समाजकार्य करता करता महिला सक्षमीकरणासाठी काम करावे आणि महिलांना प्रोत्साहित करावे, पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न शबनम न्यूज करीत असल्याचे खडसे यांनी सांगितले.”
सदर सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना इरफान सय्यद, पैगंबर शेख, इम्रान शेख यांनी देखील शबनम न्यूज मीडिया ग्रुप करीत असलेल्या कामाचे कौतुक करत मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनीच पुरस्कार्थीना अभिनंदन केले.
या कार्यक्रमात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत असताना संपादिका शबनम सय्यद यांच्या कार्याचे कौतुक केले. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने फक्त बातमी देण्याचे काम होत नसून समाजातील व्यक्तींना प्रोत्साहन करण्याचे काम देखील होत आहे. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने अनेक सामाजिक कार्य करण्यात येतात. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक असे उल्लेखनीय कार्यक्रम राबविले जाते.

दरवर्षीप्रमाणे मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार समाजातील विविध घटकात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. सातत्याने शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने हा पुरस्कार दिला जात आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबतच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान, ज्येष्ठ नागरिक सन्मान, महिला बचत गट सन्मान याप्रसंगी करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शबनम सय्यद यांच्या त्या करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार्थींमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका मीनल यादव, शिवसेनेचे शहर उप प्रमुख निखिल उमाकांत दळवी, सामाजिक कार्यकर्त्या सीताताई राम केंद्रे, आदर्श कामगार लक्ष्मण सर्जेराव शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा शांतादेवी जयसिंगराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विनोद सत्यशीला शंकरराव वरखडे, सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद, पिंपळे निलखचे सुपूर्त शिरीष संभाजीराव साठे, संघर्षातून घडलेला युवक अभिजीत तानाजी कदम, आदर्श कामगार किरण दिनकर बागल, थेरगाव चे सुपुत्र अनिकेत परशुराम प्रभू, यशस्वी उद्योजक संजय जगताप व जनसेवक मारुती जाधव, पिंपरीतील सक्षम नेतृत्व सुरेश लोंढे, कायदेतज्ञ ॲड. विशाल जाधव, समाजात महिला नेतृत्व म्हणून नावारूपास येत असलेल्या आस्मा इम्रान शेख, जैन समाजातून उदयोन्मुख व्यक्तिमत्व संदेश गादीया, प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अश्विनी नामदेव शिंदे, ए.के.ढवळे नेओबिल्ड कंपनीचे संचालक आबा ढवळे, या व्यक्तींचा यंदाचा मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन रेहान हुसेन, फरदीन सय्यद, सानिया सय्यद, युनूस खातीब यांनी केले तर सूत्रसंचालन निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर प्रस्तावना गजाला सय्यद यांनी केली व आभार आसिया इनामदार यांनी मानले.







