शबनम न्यूज | प्रतिनिधी
सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पिंपरीच्या सभासदांचा प्रथम मेळावा संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.७) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने बँकेची सभासद उपस्थित होते. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्यावतीने सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची निवड करण्यात आली.यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले,माजी संचालक अशोक दखनेजा, माजी संचालक व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज, नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली.
यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सेवा विकास बँकेतील बहुमतातील कर्मचारी सप्टेंबर २०२५ ला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद झाले. त्यांच्याकडून बँकेच्या लिक्विडेटर कडून झालेल्या अन्यायाची माहिती मिळाली. त्यावरून अप्पर कामगार आयुक्त कार्यालय यांना संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला व बँकेचे विभाग बंद करताना व कामगारांना कामावरून काढताना महाराष्ट्र शासनाची व कामगार विभागाची परवानगी घेतली होती का? याबाबतची लेखी विचारणा संघटनेच्या वतीने आम्ही केली. त्यावेळेस अशाप्रकारे अर्जही केलेला नाही ही माहिती पुढे आली व बँकेच्या चौकशीचे पत्र माननीय अपर कामगार आयुक्त पुणे यांना आम्ही त्यावेळेस दिले. त्यावरून असे निदर्शनास आले की लिक्विडेडर यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने शासनाची परवानगी न घेता २०५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले व बँकेचे काही विभाग देखील बंद केलेले आहेत. आमच्या तक्रारीवरून माननीय कामगार आयुक्त मुंबई यांनी शासकीय कामगार अधिकारी यांना बँकेच्या चौकशीसाठी पाठवले. त्याचप्रमाणे शासकीय कामगार अधिकारी यांनी बँकेची याबाबत चौकशी देखील केलेली आहे. शासकीय कामगार अधिकारी येणार हे कळताच २०५ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रखडलेल्या वेतनाची आठ ते दहा टक्के रक्कम जवळपास दोन ते तीन लाख जमा करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
आज रविवार रोजी बँकेचे सभासद,ठेवीदार,ग्राहक व सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभाग घेतला व सर्वांनी ही बँक पुन्हा सुरू करावी अशी एक मुखाने मागणी केली. सेवा बँक बचाव कृती समिती स्थापन करावी असे सूचना सभासदांच्या वतीने आली त्यानुसार या मेळाव्यामध्ये सेवा विकास सहकारी बँक मर्यादित बचाव कृती समितीची स्थापना करत असल्याची घोषणा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी करताच बँकेचे माजी संचालक अशोकराव दखनेजा यांनी तो ठराव मेळाव्यामध्ये मांडला व त्यास व्ही. टी जोगदंड यांनी अनुमोदन दिल्याचे जाहीर केले. या मेळाव्यात या कृती समितीच्या अध्यक्षस्थानी एस बी ओहाळ यांची निवड केल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.
उपस्थित सर्व सभासदांनी कृती समितीच्या स्थापनेला आणि अध्यक्ष निवडीला एक मुखाने हात वर करून मंजुरी दिली. सेवा विकास बचाव कृती समितीच्या वतीने दि सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा परवाना रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी रद्द केला तो पुनः प्राप्त करण्यात यावा आणि या बँकेस परवाना पुन्हा बहाल करून तिचे कार्य पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. लिक्विडेटर यांची सध्याची नियुक्ती रद्द करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे आणि बँकेचे संपूर्ण नियंत्रण हे पुन्हा बँकेच्या संबंधित सभासदांच्या ताब्यात देण्यात यावे व त्यांना व्यवस्थापक संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार बहाल करण्यात यावेत असा ठराव माननीय आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन तसेच बँकेचा लिक्विडेटर यांना देण्याचे यावेळी ठरले.तसेच २०५ कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घेऊन थकीत त्यांचे मागील तीन वर्षाचे वेतन द्यावे असा ठराव करून या दोन्ही ठराव माननीय आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन पुणे यांना तसेच लिक्विडेटर सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना द्यावा असा ठराव देखील एकमुखाने मंजूर करण्यात आला. याच मेळाव्यामध्ये सेवा विकास को-ऑपरेटिव बँक स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून व्यापाऱ्यांनी ही उभी केलेली सहकारी बँक हा प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे इतर कोणत्याही सहकारी वित्तीय संस्थेला अथवा बँकेला विलीन अथवा हस्तांतरित करू नये असा ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला. हा ठराव देखील मा आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन व लिक्वीटर यांना सेवा विकास बँक बचाव कृती समितीच्या वतीने तथा बँकेच्या सभासदांच्या स्वाक्षरीने ठरले हे आज सर्व ठराव पाठवण्याचे ठरले.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सभासद,व्यापारी व ग्राहक, ठेवीदार, कृती समितीच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारी उपस्थित सभासदांनी घेतली.
सूत्रसंचालन व आभार सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले.







