spot_img
spot_img
spot_img

पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी
नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ या नि:शुल्क असलेल्या दोन अंकी विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी मनमुराद हसत उत्स्फूर्त दाद दिली. शुक्रवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित महापौर निवासस्थान मैदान,  निगडी प्राधिकरण येथे या नाट्यप्रयोगाला माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, अनुप मोरे, सरिता साने, अतुल इनामदार, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘करून गेलो गाव’ या धमाल विनोदी दोन अंकी नाटकात सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम हे ‘अण्णा’ या मध्यवर्ती भूमिकेत सर्व प्रेक्षकांचे आकर्षणबिंदू होते. अर्थातच त्यांनी ओंकार भोजने, उषा साटम, नुपूर दुडवडकर, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, प्रणव जोशी, सुमीत सावंत, दीपक लांजेकर, सचिन शिंदे या सहकलाकारांसह आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत क्षणभरही उसंत न देता उपस्थितांना यथेच्छ हास्याची मेजवानी दिली. कोकणातील मौजे वेडगाव बुद्रूक या काल्पनिक खेड्यातील ग्रामस्थ नाटक बसवण्यासाठी एकत्र जमतात; पण स्थानिक आमदार मात्र बकुळा या नखरेल नर्तकीचा कार्यक्रम करण्याचा हट्ट धरतो. धनदांडगा, दुराग्रही आमदार विरुद्ध सारा गाव हे नाटकाचे कथासूत्र मालवणी भाषेतील द्व्यर्थी, चावट पण कोटिबाज आणि चटपटीत संवादातून अतिशय वेगाने पुढे सरकत असताना त्यामध्ये कलाकारांच्या गतिमान हालचाली, सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग याशिवाय आकर्षक नृत्ये आणि सुंदर नेपथ्य यांची गोळाबेरीज इतकी जमून आली होती की, प्रेक्षक नेमक्या ठिकाणी उत्स्फूर्त हशासह जोरदार दाद देत होते. एक सुंदर नाट्यकृती अनुभवल्याचा आनंद यावेळी उपस्थितांच्या चेहर्‍यावर होता.
नाटकाच्या मध्यांतरात नमस्कार महोत्सवाच्या संयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!