spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार- २०२५’ प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार-2025’ प्रदान करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नागपूरच्या अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जितना या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात. तर, पुण्यातील भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या श्रवण बाधित असूनही कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून त्यांनी 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, कुमारी धृती रांका (पुणे) हिला श्रेष्ठ दिव्यांग बाल-बालिका श्रेणीत सन्मान मिळाला. धृती ‘टिकलर आर्ट’ची संस्थापक असून न्यूरो-डायव्हर्स कलाकारांच्या आजीविकेला प्रोत्साहन देते आणि तिने शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

याव्यतिरिक्त  प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट आणि समाजसेविका देवांगी पराग दलाल (विलेपार्ले, मुंबई) यांनाही पुरस्कृत करण्यात आले. त्यांनी जोश फाउंडेशनच्या माध्यमातून 2000 हून अधिक मुलांना मोफत श्रवण यंत्रे आणि थेरपी प्रदान केली आहे. संस्था श्रेणीत जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (मुंबई) या संस्थेला बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांगता असलेल्या व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरविण्यात आले. तसेच, डिजिटल सुगमता क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या बॅरियर ब्रेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई) ला सर्वोत्कृष्ट सुगम्य माहिती तंत्रज्ञान श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.

 

दिव्यांगजन समानतेचे भागीदार: राष्ट्रपती

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्या, दिव्यांगजन हे समानतेचे हक्कदार आहेत. समाज आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांची समान भागीदारी निश्चित करणे हे सर्वांचे  कर्तव्य आहे. दिव्यांगजनांच्या समान सहभागानेच कोणताही समाज खऱ्या अर्थाने विकसित समाज ओळखला जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने आता कल्याणकारी दृष्टिकोन सोडून ‘अधिकार-आधारित, सन्मान-केंद्रित व्यवस्था’ स्वीकारली आहे. 2015 पासून ‘दिव्यांगजन’ या शब्दाचा वापर करण्याचा निर्णय त्यांच्याप्रति विशेष आदर दर्शवतो. सुगम्य भारत अभियान, 2016 चा दिव्यांगजन अधिकार कायदा आणि राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीतून दिव्यांगजनांना सशक्त केले जात आहे. यावेळी त्यांनी विशेषत: श्रेष्ठ दिव्यांग बालक मास्टर मोहम्मद यासिन (केरळ) आणि श्रेष्ठ दिव्यांग बालिका कुमारी धृती रांका (पुणे, महाराष्ट्र) यांच्यासह पुरस्कारप्राप्त सर्व मुलींच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी वैष्णवी थापा या दृष्टिहीन विद्यार्थिनीने  सरस्वती वंदना सादर केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!