शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी (दि.२ डिसेंबर २०२५) सायंकाळी ०५.४५ वा. च्या सुमारास एक तरुण व्यक्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली जमीनीवर उडी मारण्याच्या उद्देशाने चढली होती. या बाबत नागरिकांमार्फत माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेत सदर व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.
घटनेबाबत अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पथकाने प्रसंगावधान राखून स्विफ्ट रेस्क्यू ऑपरेशन राबवत सदर व्यक्तीला दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना चपळतेने पकडून त्याला सुरक्षितपणे इमारतीच्या खाली आणले. चौकशी केली असता ही व्यक्ती उडी मारण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावर चढली होती. मात्र वेळीच अग्निशमन विभागाला माहिती मिळाल्यामुळे तसेच बचाव पथकाच्या त्वरित कार्यवाहीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास अग्निशमन विभागास यश मिळाले. सदर कार्यवाही वरिष्ठ फायरमन भूषण येवले, यांच्या नेतृत्वात फायरमन दीपक कोठे, तेजस पवार, जय जमादार, स्नेहा जगताप, वाहनचालक विशाल बानेकर यांच्यासह दलातील इतर जवानांनी समन्वयाने केली.
दरम्यान, अग्निशमन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आढळून येता क्षणी तात्काळ १०१ वर संपर्क साधावा.
अग्निशमन दलासाठी प्रत्येक आपत्ती म्हणजे वेळेशी सुरू असलेली शर्यत असते. वल्लभनगर येथील घटना याला अपवाद नव्हती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच परिस्थितीचे अचूक मूल्यमापन केले आणि प्रशिक्षित पद्धतीने व्यक्तीस सुरक्षित खाली आणले.
— व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
अग्निशामक बचाव पथकाने सुरक्षितपणे पार पाडलेली बचाव मोहीम ही प्रशंसनीयच नव्हे तर शहरासाठी अभिमानास्पद आहे. अशा विचित्र परिस्थितींमध्ये छोट्यातल्या छोट्या निर्णयाचा मोठा विपरीत परिणाम देखील होण्याची शक्यता राहते, तरीही पथकाने अत्यंत संयमाने, धोका ओळखून आणि आवश्यक तांत्रिक कौशल्याचा वापर करून बचाव पथक प्रमुख वरिष्ठ फायरमन भूषण येवले यांनी पथकातील अन्य जवानांच्या मदतीने संबंधितास बोलण्यात व्यस्त ठेवून त्यांचे लक्ष विचलित केले व पथक प्रमुखाचा इशारा मिळताच अग्निशामक जवान दीपक कोठे यांनी अत्यंत चपळतेने धोकेदायक स्थितीत विशेष कार्यवाही करत झेप घेत सदर व्यक्तीवर प्रथम नियंत्रण मिळविण्याची कार्यवाही सुरक्षितपणे पार पाडली. कोणत्याही विपरीत धोकेदायक परिस्थितीचा सामना करत नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यास आमचे जवान नेहमीच सज्ज असतात.
— ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका



