‘पिंपरी चिंचवड वैभव’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
शबनम न्यूज | प्रतिनिधी
”पिंपरी चिंचवड वैभव’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला शहराचा पद्यरूप इतिहास ही अतिशय अभिनव संकल्पना आहे!’ असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (छोटे सभागृह) प्रेक्षागृह येथे बुधवार, दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना वर्षा उसगावकर बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्षस्थानी होते; तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अभय कुलकर्णी, सनदी लेखापाल प्रा. डॉ. अशोक पगारिया, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पवार, कांचन जावळे, सुषमा जावळे, आणि पिंपरी-चिंचवड मराठी भाषा संवर्धन समिती सल्लागार संभाजी बारणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

वर्षा उसगावकर पुढे म्हणाल्या की, ‘गायकाचा सूर लागल्यावर जशी मैफल रंगत जाते त्याप्रमाणे नृत्य आणि गायनाने सुरू झालेला हा प्रकाशनसोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. पूर्वी मला कवितांची भीती वाटायची; पण आमच्या एका कौटुंबिक स्नेहाने ‘कविता म्हणजे जीवनाचे सत्त्व असते’ असे माझ्या मनावर बिंबवल्यावर मला कवितांची गोडी लागली. ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात सहभागी झालेल्या सर्व कवींचे मी अभिनंदन करते!’ राजन लाखे यांनी लालित्यपूर्ण शैलीतल्या प्रास्ताविकातून सांगितले की, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ही पस्तीस वर्षे जुनी असून दोन वेळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून सन्मानित झालेली आहे. कवितांच्या माध्यमातून पिंपरी – चिंचवड या शहराचा इतिहास शब्दबद्ध व्हावा, अशी संकल्पना संभाजी बारणे यांनी मांडल्यावर आम्ही शहरातील कवींना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सुमारे १५२ कवींनी प्रतिसाद दिला; आणि त्यातून निवड करून काव्यसंग्रहासाठी एकूण ९६ कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला!’ भाऊसाहेब भोईर यांनी मार्मिक शैलीतून, ‘विद्येचे माजघर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक कीर्तीचे मान्यवर येतात, हेच या शहराचे यश आहे!’ असे मत व्यक्त केले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘भौतिक संसाधनांपेक्षा ऐतिहासिक मूल्यांच्या जपणुकीमध्ये शहराची श्रीमंती ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड शहराला भोजापूरच्या रूपाने दोन हजार वर्षांपासूनचा समृद्ध इतिहास लाभला आहे. ‘पिंपरी चिंचवड वैभव’ हा काव्यसंग्रह शहराचे सांस्कृतिक वैभव आहे!’ असे विचार मांडले.
ज्येष्ठ लेखिका कै. विनीता ऐनापुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रकाशनानंतर प्रा. सुरेखा कटारिया, डॉ. अकिला इनामदार, कमल सोनजे, माधुरी डिसोजा, मंगला पाटसकर, प्रा. सुभाष आहेर, डॉ. नीलकंठ मालाडकर, सीताराम नरके, रमेश पिंजरकर या सहभागी कवींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. फिरोज मुजावर यांनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. सुनीता बोडस, किरण लाखे, नीलिमा फाटक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी बारणे यांनी आभार मानले. रिचा राजन यांनी गायलेल्या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि पसायदानाने समारोप करण्यात आला.



