काम वेळेत पूर्ण करण्याची भाजपच्या अनिताताई संदीप काटे यांची मागणी…
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक २८ मधील कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटिकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू असून काही भागात हे काम वेगाने सुरू आहे, तर अनेक ठिकाणी अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
याचबरोबर रस्त्यालगतच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उड्डाणाऱ्या धुळीपासून, उखडलेल्या रस्त्यापासून आणि वळण रस्त्यांमुळे सतत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटी, महापालिका, महावितरण आणि गॅस कंपन्या यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कामाचा वेग मंदावल्याचे समजते.
कुणाल आयकॉन रोड हा परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहतूकीमुळे अत्यंत महत्त्वाचा असून, कॉंक्रिटकरण पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. मात्र, सध्या सुरु असलेली संथ गती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे लक्षात घेता महापालिका आणि स्मार्ट सिटी विभागाने यंत्रणा वाढवून काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे आणि कुणाल आयकॉन रस्त्याला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी भाजपच्या अनिताताई संदीप काटे यांनी केली आहे.
”हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. स्मार्ट सिटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने एकत्रितपणे काम करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. जेणेकरून प्रभाग क्रमांक २८ मधील सोसायटी वर्गाला दिलासा मिळेल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल”.
– संदीप काटे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते…
”पिंपळे सौदागरमध्ये उच्चभ्रू लोक वास्तव्यास आहेत. सर्वात जास्त कर या भागातून महापालिकेला मिळतो. कुणाल आयकॉन रोड येथे रस्त्याचे कॉंक्रिटिकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम अगदी संथ गतीने सुरु आहे. स्मार्ट सिटी आपण म्हणतो पण कामे स्मार्टली होत नाहीत. विजेच्या, पाण्याच्या, गॅसच्या अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. समन्वयाने काम केल्यास हा प्रकल्प वेगात पूर्ण होऊ शकतो.
– चंदन चौरसिया, स्थानिक नागरिक-रोजलैड रेसिडेन्सी…



